Friday 8 May 2015

एका तळ्याची गोष्ट


एक छोटस, सुंदर तळ होत. जणू काय त्याने त्या पाण्याला घट्ट मिठीत घेतलय असच वाटत होत अन् ते पाणी देखील शांत निपचित त्याच्या मिठीत पडून होत. त्यात बरीचशी कमळाची फुले वार्यावरती डुलत होती. एखाद्या प्रियकराने त्याच्या प्रेयसी ला मिठीत घ्यावे अन् तिचे अंग अंग शहरावे, अगदी त्याचप्रमाणे त्या पाण्यावर तरंग उमटत होते. आजूबाजूच्या झाडांना, वेलींना अन् पक्षांना देखील त्यांचे खूप आकर्षण होते. एवढेच नाही, तर रात्रीचा चंद्र देखील असंख्य चांदण्या घेऊन त्या तळ्यात उतरायचा.  दिवस पक्षांच्या किल-बिलात सरायचा तर रात्री हे तळ चांदण्या अंगावरती घेऊन शांत झोपी जायचा. सार अगदी स्वर्गमय वाटत होत.
पण आता उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले होते, जंगल जाळत उन तळ्यापर्यंत पोहचल होत. हातातून रेती निसटून जावी तशी त्या तळ्याच्या मिठीतून ते पाणी हळू हळू निसटून जाऊ लागले. त्याच्या घट्ट मिठीचा काहीही फायदा झाला नाही.  त्या तळ्याने केविलपणाने आभाळाकडे खूप विनवण्या देखील केल्या पण काहीच फायदा झाला नाही. निसटून जाणार्या पाण्याकडे तो एकटक रागात पाहत होता. काठ सोडून पाणी तळाकडे सरकू लागलं. अन् एके दिवशी त्या घट्ट मिठीतून पाणी कायमचा निघून गेल. आता ते तळ राहिला नसून एक खड्डा बनला होता. पण अजूनही त्यात पाण्याच्या खुणा तशाच होत्या. काठावरची हिरवळ जाळून गेली होती, पक्ष्यांची किलबिल शांत झाली होती. झाड देखील आपली शेवटची घटका मोजत उभी होती. अश्रू ओघळावे त्या प्रमाणे त्या झाडांची पान तळ्यात पडत होती. सर्व जन त्या तळ्याला एकट सोडून निघून गेले होते. स्वर्गाप्रमाणे वाटणारे जीवन क्षणात बेचिराख झाले होते. चांदण्या तर आता स्वप्नात पण दिसत नव्हत्या, नशिबात उरला होता तो फक्त एकांत, अधून मधून उठणाऱ्या गरम वावटळी, धूळ एवढेच..  सर्वकाही भकास आणि भयावह बनले होते. दिवस आणि रात्र फक्त आठवणीत सरत होते. आता अश्रू देखील सुकले होते. त्याला आता एकांतच हवाहवासा वाटत होता. त्या उन्हाने तो अगदी राठ बनला होता. दिवसा जाळणारे उन आणि रात्री सोसाट्याचा वारा, एवढेच जीवन बनले होते.
काही कालावधीनंतर दिवस बदलले.. आभाळात काळे ढग जमा झाले. ते पाहून त्याला जुने दिवस आठवू लागले. ती पक्ष्यांची किलबिल, ते हिरवेगार काठ, आजूबाजूची झाड आणि मिठीतले पाणी... सार काही भराभरा आठवू लागल. अन् बर्याच दिवसानंतर त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.. पण अचानक ते हास्य कुठेतरी पळून गेले. त्याने आभाळाकडे पाहिले अन् पुन्हा विनवण्या करू लागला. त्याला आता पाणी नको होत. तो आता त्यांना बरसू नये म्हणून विनंती करत होता. अन् या वेळेस आभाळाने त्याची विनंती मान्य केली. प्रेम करण्याची शिक्षा तो भोगत होता, आता त्याला पुन्हा तीच चूक करायची नव्हती. त्या दिवसापासून तिथे एकदाही ढग बरसला नाही, आजही ते तळ पाण्याच्या खुणा घेऊन तसच निपचित पडलय. स्थलांतरित झालेले पक्षी अजूनही त्याचीच कहाणी सांगत असतात.
                                                           -- प्रतिक कळमकर

Thursday 13 November 2014

Valentine day...!!!

पहाटेचे ५, याच वेळेस भेटायचे ठरले होते आमचे.. तसा मी लवकरच आलो होतो.
बागेत निरागस अशी शांतता होती. चंद्र आपले अस्तित्व दाखवत अजूनही जागा होता. त्याच्या शीतल प्रकाशाने बाग भरून गेली होती. चांदण्यांनी आभाळ अगदी गच्च भरून गेले होते. थंड वारा इकडून तिकडे खेळत होता. आजूबाजूला बरीच झाड थाटात उभी होती अन त्यांना घट्ट मिठी मारून वेली शांत पडल्या होत्या. पाखरे अजूनही झोपलेलीच होती.
मग मी घड्याळाकडे पाहत एका बेंचवर जाऊन बसलो. तो सिमेंट चा बेंच खूपच गार पडला होता. नेहमीप्रमाणे मीच वाट पाहत होतो. नंतर त्या पाय वाटेवरून कुणीतरी येताना दिसले आणि माझे वाट पाहणे संपले...
तिला समोर पाहून एकदम शहारून आले, खूप आनंद झाला, ओठांतून शब्द बाहेर पडत नव्हते.. मग मी माझ्याकडचे गुलाबाचे फुल तिला दिले अन् तिने तिच्या कोमल, नाजूक हातांचा हार माझ्या गळ्यात टाकत मला मिठी मारली. तिच्या मिठीत मी पूर्णपणे विरघळून गेलो होतो, जगाचा विसर पडला होता, वेळेच भान राहिले नव्हते, दोघेही डोळे मिटून शांत पडले होते. येणारी प्रत्येक झुळूक तिची मिठी घट्ट करत होती. मग मी मिठी जरा सैल केली आणि आम्ही मिठीतून वेगळे झालो.
त्यानंतर आम्ही दवाने ओल्या झालेल्या वाटेवर चालत तळ्याकडे जाऊ लागलो. तिने माझ्या बोटांमधली जागा तिच्या बोटांनी भरून टाकली अन् घट्ट हात पकडला. चालता चालता तिने माझ्या खांद्यावर डोके ठेवले. तिच्या केसांचा मऊसरपणा माझ्या गालांना जाणवत होता. ती खूप शांत झाली होती, तिच्या चेहऱ्यावर एक समाधान होते.
मग आम्ही तळ्याकाठी जाऊन बसलो. त्या तळ्यात चंद्राचे प्रतिबिंब पडले होते, थंड हवेची ती झुळूक, मनात आणि पाण्यात तरंग उमटवून जात होती. त्या शुभ्र प्रकाशात तळ्यातील कमळाचे फुल चिंब भिजून निघाले होते. मग तिने अलगद् माझ्या खांद्यावर डोके ठेवले अन् माझा हात हातात घेतला. मग मी पण तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला जवळ घेतले. ती अजूनही खूप शांत होती, खूप शहारली होती, तिचा चेहरा एखाद्या चांदणी प्रमाणे निखरला होता. मला माझा मोह आवरता आला नाही, तिच्या गार पडलेल्या हातावर मी अलगद् ओठ टेकवले, तशी ती जरा दचकली, लाजली, अन् उठून जाऊ लागली. पुन्हा मी तिचा हात पकडला अन् उभा राहिलो. मग ती हळूच माझ्याकडे वळली, नजर मात्र झुकलेलीच होती, माझ्याकडे पाहण्याचे तिचे धाडस होत नव्हते. मग मी दोन बोटं तिच्या हनुवटी खाली नेऊन तिचा चेहरा माझ्या चेहर्यासमोर आणला. तिची नजर माझ्या नजरेला भिडली अन् थेट काळजापर्यंत जाऊन पोहचली, माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला. तिची नजर जणू अखंड साथ देण्याचे वचनच मागत होती. तिच्या मनाची बैचेनी मला जाणवत होती.. मग मी नजरेनेच होकार दिला आणि तिने मला घट्ट मिठी मारली.
पहाट गुलाबी रंगात बुडून गेली होती, प्रभातरंग फांद्यातून वाट काढत अंगावर बरसू लागले, पाखरं किलबिल करू लागली, धुकं विरून जाऊ लागली, पानं-फुलं अंगावर दवं घेऊन चमकू लागली. पण मनात ती पहाट अजून तशीच होती, अजूनही गारवा होताच, अजूनही चंद्र जागाच होता, आभाळ अजूनही चांदण्यांनी भरलेल होत, अजूनही तरंग उमटतच होता, अजूनही शहरा येतच होता.......
                                
                          -- प्रतिक कळमकर