पहाटेचे ५, याच वेळेस भेटायचे ठरले होते आमचे.. तसा मी लवकरच आलो होतो.
बागेत निरागस अशी शांतता होती. चंद्र आपले अस्तित्व दाखवत अजूनही जागा होता. त्याच्या शीतल प्रकाशाने बाग भरून गेली होती. चांदण्यांनी आभाळ अगदी गच्च भरून गेले होते. थंड वारा इकडून तिकडे खेळत होता. आजूबाजूला बरीच झाड थाटात उभी होती अन त्यांना घट्ट मिठी मारून वेली शांत पडल्या होत्या. पाखरे अजूनही झोपलेलीच होती.
मग मी घड्याळाकडे पाहत एका बेंचवर जाऊन बसलो. तो सिमेंट चा बेंच खूपच गार पडला होता. नेहमीप्रमाणे मीच वाट पाहत होतो. नंतर त्या पाय वाटेवरून कुणीतरी येताना दिसले आणि माझे वाट पाहणे संपले...
तिला समोर पाहून एकदम शहारून आले, खूप आनंद झाला, ओठांतून शब्द बाहेर पडत नव्हते.. मग मी माझ्याकडचे गुलाबाचे फुल तिला दिले अन् तिने तिच्या कोमल, नाजूक हातांचा हार माझ्या गळ्यात टाकत मला मिठी मारली. तिच्या मिठीत मी पूर्णपणे विरघळून गेलो होतो, जगाचा विसर पडला होता, वेळेच भान राहिले नव्हते, दोघेही डोळे मिटून शांत पडले होते. येणारी प्रत्येक झुळूक तिची मिठी घट्ट करत होती. मग मी मिठी जरा सैल केली आणि आम्ही मिठीतून वेगळे झालो.
त्यानंतर आम्ही दवाने ओल्या झालेल्या वाटेवर चालत तळ्याकडे जाऊ लागलो. तिने माझ्या बोटांमधली जागा तिच्या बोटांनी भरून टाकली अन् घट्ट हात पकडला. चालता चालता तिने माझ्या खांद्यावर डोके ठेवले. तिच्या केसांचा मऊसरपणा माझ्या गालांना जाणवत होता. ती खूप शांत झाली होती, तिच्या चेहऱ्यावर एक समाधान होते.
मग आम्ही तळ्याकाठी जाऊन बसलो. त्या तळ्यात चंद्राचे प्रतिबिंब पडले होते, थंड हवेची ती झुळूक, मनात आणि पाण्यात तरंग उमटवून जात होती. त्या शुभ्र प्रकाशात तळ्यातील कमळाचे फुल चिंब भिजून निघाले होते. मग तिने अलगद् माझ्या खांद्यावर डोके ठेवले अन् माझा हात हातात घेतला. मग मी पण तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला जवळ घेतले. ती अजूनही खूप शांत होती, खूप शहारली होती, तिचा चेहरा एखाद्या चांदणी प्रमाणे निखरला होता. मला माझा मोह आवरता आला नाही, तिच्या गार पडलेल्या हातावर मी अलगद् ओठ टेकवले, तशी ती जरा दचकली, लाजली, अन् उठून जाऊ लागली. पुन्हा मी तिचा हात पकडला अन् उभा राहिलो. मग ती हळूच माझ्याकडे वळली, नजर मात्र झुकलेलीच होती, माझ्याकडे पाहण्याचे तिचे धाडस होत नव्हते. मग मी दोन बोटं तिच्या हनुवटी खाली नेऊन तिचा चेहरा माझ्या चेहर्यासमोर आणला. तिची नजर माझ्या नजरेला भिडली अन् थेट काळजापर्यंत जाऊन पोहचली, माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला. तिची नजर जणू अखंड साथ देण्याचे वचनच मागत होती. तिच्या मनाची बैचेनी मला जाणवत होती.. मग मी नजरेनेच होकार दिला आणि तिने मला घट्ट मिठी मारली.
पहाट गुलाबी रंगात बुडून गेली होती, प्रभातरंग फांद्यातून वाट काढत अंगावर बरसू लागले, पाखरं किलबिल करू लागली, धुकं विरून जाऊ लागली, पानं-फुलं अंगावर दवं घेऊन चमकू लागली. पण मनात ती पहाट अजून तशीच होती, अजूनही गारवा होताच, अजूनही चंद्र जागाच होता, आभाळ अजूनही चांदण्यांनी भरलेल होत, अजूनही तरंग उमटतच होता, अजूनही शहरा येतच होता.......
-- प्रतिक कळमकर
Thursday, 13 November 2014
Valentine day...!!!
Subscribe to:
Comments (Atom)