एक छोटस, सुंदर तळ होत. जणू काय त्याने त्या पाण्याला घट्ट मिठीत घेतलय असच वाटत होत अन् ते पाणी देखील शांत निपचित त्याच्या मिठीत पडून होत. त्यात बरीचशी कमळाची फुले वार्यावरती डुलत होती. एखाद्या प्रियकराने त्याच्या प्रेयसी ला मिठीत घ्यावे अन् तिचे अंग अंग शहरावे, अगदी त्याचप्रमाणे त्या पाण्यावर तरंग उमटत होते. आजूबाजूच्या झाडांना, वेलींना अन् पक्षांना देखील त्यांचे खूप आकर्षण होते. एवढेच नाही, तर रात्रीचा चंद्र देखील असंख्य चांदण्या घेऊन त्या तळ्यात उतरायचा. दिवस पक्षांच्या किल-बिलात सरायचा तर रात्री हे तळ चांदण्या अंगावरती घेऊन शांत झोपी जायचा. सार अगदी स्वर्गमय वाटत होत.
पण आता उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले होते, जंगल जाळत उन तळ्यापर्यंत पोहचल होत. हातातून रेती निसटून जावी तशी त्या तळ्याच्या मिठीतून ते पाणी हळू हळू निसटून जाऊ लागले. त्याच्या घट्ट मिठीचा काहीही फायदा झाला नाही. त्या तळ्याने केविलपणाने आभाळाकडे खूप विनवण्या देखील केल्या पण काहीच फायदा झाला नाही. निसटून जाणार्या पाण्याकडे तो एकटक रागात पाहत होता. काठ सोडून पाणी तळाकडे सरकू लागलं. अन् एके दिवशी त्या घट्ट मिठीतून पाणी कायमचा निघून गेल. आता ते तळ राहिला नसून एक खड्डा बनला होता. पण अजूनही त्यात पाण्याच्या खुणा तशाच होत्या. काठावरची हिरवळ जाळून गेली होती, पक्ष्यांची किलबिल शांत झाली होती. झाड देखील आपली शेवटची घटका मोजत उभी होती. अश्रू ओघळावे त्या प्रमाणे त्या झाडांची पान तळ्यात पडत होती. सर्व जन त्या तळ्याला एकट सोडून निघून गेले होते. स्वर्गाप्रमाणे वाटणारे जीवन क्षणात बेचिराख झाले होते. चांदण्या तर आता स्वप्नात पण दिसत नव्हत्या, नशिबात उरला होता तो फक्त एकांत, अधून मधून उठणाऱ्या गरम वावटळी, धूळ एवढेच.. सर्वकाही भकास आणि भयावह बनले होते. दिवस आणि रात्र फक्त आठवणीत सरत होते. आता अश्रू देखील सुकले होते. त्याला आता एकांतच हवाहवासा वाटत होता. त्या उन्हाने तो अगदी राठ बनला होता. दिवसा जाळणारे उन आणि रात्री सोसाट्याचा वारा, एवढेच जीवन बनले होते.
काही कालावधीनंतर दिवस बदलले.. आभाळात काळे ढग जमा झाले. ते पाहून त्याला जुने दिवस आठवू लागले. ती पक्ष्यांची किलबिल, ते हिरवेगार काठ, आजूबाजूची झाड आणि मिठीतले पाणी... सार काही भराभरा आठवू लागल. अन् बर्याच दिवसानंतर त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.. पण अचानक ते हास्य कुठेतरी पळून गेले. त्याने आभाळाकडे पाहिले अन् पुन्हा विनवण्या करू लागला. त्याला आता पाणी नको होत. तो आता त्यांना बरसू नये म्हणून विनंती करत होता. अन् या वेळेस आभाळाने त्याची विनंती मान्य केली. प्रेम करण्याची शिक्षा तो भोगत होता, आता त्याला पुन्हा तीच चूक करायची नव्हती. त्या दिवसापासून तिथे एकदाही ढग बरसला नाही, आजही ते तळ पाण्याच्या खुणा घेऊन तसच निपचित पडलय. स्थलांतरित झालेले पक्षी अजूनही त्याचीच कहाणी सांगत असतात.
-- प्रतिक कळमकर
Friday, 8 May 2015
एका तळ्याची गोष्ट
Subscribe to:
Comments (Atom)